बीड - जिल्ह्यातील शिरूर कासार आणि बीड तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या नारायणगड परिसरात तीन गुहा आहेत. या गुहा सिंधुसंस्कृतीशी नाते असल्याचे बोलले जाते. मात्र, अद्यापही या गुंफांचे रहस्य गुलदस्त्यातच आहे. या गुहा कोणी तयार केल्या? कशासाठी केल्या? या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे गुहांचे पुरातत्त्व विभागाकडून शास्त्रीयदृष्ट्या संशोधन करण्याची मागणी संशोधकांनी केली आहे.
विशेष म्हणजे या गुहांचा उल्लेख नामदेव लिंबाजी शेमडे या लेखकाने सुरुवातीला आपल्या पुस्तकात केलेला आहे. 'धाकटी पंढरी; श्री क्षेत्र नारायणगड' असे पुस्तकाचे नाव आहे. अलीकडच्या काळात बीड येथील संशोधक डॉ. बाळासाहेब पिंगळे यांनी देखील नारायणगडाचा इतिहास सांगणारे एक पुस्तक लिहिले आहे.
बीडपासून पंचवीस-तीस किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारायण गड देवस्थान आहे. अठराव्या शतकात महात्मा नगद नारायण स्वामी यांच्यामुळे हे देवस्थान प्रसिद्धीस आले. या ठिकाणी महादेवाची स्वयंभू मूर्ती आहे. अत्यंत प्राचीन काळातील असलेले हे मंदिर आणि परिसर बौद्ध संस्कृती तसेच अतिप्राचीन असलेली सिंधू संस्कृतीचीशी नाते सांगणारा आहे, असे मत संशोधक डॉ. बाळासाहेब पिंगळे यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारायण गड परिसरात पाच किलोमीटरच्या अंतरात तीन गुहा आहेत. मंदिराच्या पूर्वेकडे म्हणजेच बेलोरा शिवारात बारवदरी नावाची गुहा आहे. याशिवाय श्री क्षेत्र नारायण गडाच्या पश्चिम बाजूला पोडुळ शिवारात एक गुहा आहे. ही गुहा ध्यानधारणेसाठी प्राचीन काळी वापरली जात होती. या गुहेत स्नानगृह देखील असल्याचे संशोधक सांगतात. याशिवाय उत्तरेला म्हणजेच साक्षाळ पिंपरी शिवारात असलेली गुहा आजही दिसते. डॉ. बाळासाहेब पिंगळे यांनी त्या गुहा नेमक्या काय सांगतात? गुहा आतमध्ये जाऊन पहिल्या आहेत. याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काम पूर्ण होऊ शकले नसल्याची खंत त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.
आम्ही आमच्या लहानपणी ही गुहा पाहिलेली आहे. आतमध्ये जाऊन बसता येत होते. मात्र, अलीकडच्या काळात ही गुहा बुजली गेली आहे. येथील रस्ता थेट गडावर म्हणजेच दीड ते दोन किलोमीटरवर अंतरावर निघतो, असे त्या भागातील ८० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक रामराव काशीद म्हणाले.
एकंदरीतच नारायणगडाच्या परिसरात त्या गुहा काय सांगतात? हे जाणून घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून शास्त्रीय दृष्ट्या या गुहांचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे संशोधक म्हणाले.