बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सोनू उर्फ रोहन नटराज धस वय 13 आणि नटराज रामहरी धस वय 33 अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या बाप लेकाची नावे आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलासांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकुरका येथील चौथीच्या वर्गात शिकत असलेला रोहन धस हा शाळा सुटल्यानंतर त्याचे वडील नटराज धस यांच्यासोबत शेतात गेला होता. शेतात गेल्यानंतर सोनू उर्फ रोहन हा त्यांच्या धस माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील राजाभाऊ धस यांच्या शेतातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला. मात्र तो पाय घसरून पाण्यात पडला. रोहन पाण्यात पडून गटांगळ्या खात असल्याचे पाहाताच जवळच उभा असलेले त्याचे वडील नटराज धस यांनी त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडून मृत्यू पावले.
विहिरीजवळ अन्य दुसरे कोणी नसल्यामुळे ते दोघे बाप-लेक विहिरीत पडल्याची कोणालाही माहिती मिळाली नाही. ते दोघेही रात्री घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेला चप्पल, विहिरीत चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला. त्यावरून ते दोघे विहिरीत पडले असल्याचा अंदाज आला. गावकऱ्यांनी विहिरीत बोराटी टाकून आणि गळ टाकून शोध घेतला. परंतु तपास लागत नव्हता.
पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला आणि त्यानंतर मुरुड येथून एका व्यक्तीला बोलावून त्याच्या मदतीने गळ सोडून मृतदेह विहिरीबाहेर काढले. यावेळी उपस्थित धस यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदूरघाट दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस जमादार अभिमान भालेराव,अशोक मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलवले आहेत. दोघा बाप लेकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा A girl raped by witchcraft साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर अत्याचार, संशयित ताब्यात