बीड - जिल्ह्यातील आष्टी येथील सुखकर्ता अर्बन निधीचे संचालक बाळासाहेब शिरसाठ यांचा मृतदेह आष्टी जवळील धनवडे वस्ती शिवारातील विहरीत शनिवारी आढळून आला. या प्रकरणात बाळासाहेब यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याबाबत संशयास्पद परिस्थिती असून आष्टी पोलीस पुढील तपास करत आहेत.
आष्टी शहरातील सुखकर्ता अर्बन निधीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कुंडलिक शिरसाठ (वय, 45) हे गुरूवारी राञी दहाच्या सुमारास घरगुती वाद झाल्याने घरातून निघून गेले. परंतु पुढील दोन दिवस त्यांचा फोन बंद असल्याने कुटुंबातील व्यक्तींनी सर्व नातेवाईक, मित्र परिवारातील व्यक्तींना फोन करून विचारपूस केली. परंतु ते कुठेही नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्यानंतर शनिवारी आष्टी शहरातील धनवडे वस्ती परिसरात चव्हाण यांच्या शेतात विहीरीचे काम करण्यासाठी कामगार गेले. धोंडे नामक एक कामगार शेजारील विहीर पाहण्यासाठी गेला असता त्याला त्या विहिरीत मृतदेह आढळला. धोंडे यांनी मुर्शदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर धोंडे यांना फोन लावून माहिती दिली. त्यांनी तत्काळ आष्टी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
क्रेनच्या सहाय्याने मृतदेह काढला बाहेर
मृताच्या गळ्याला कबंरेचा पट्टा आवळलेला व डोक्याला मार लागल्याचे दिसून आले. जर आत्महत्या केली असेल तर तो फाशी घेऊन विहिरीत उडी कसा मारेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाळासाहेब यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समोर येईल.
'बाळासाहेबांना चांगले पोहता येत होते'
मृताच्या गळ्याला कंबरेच्या पट्टयाने आवळल्याच्या खुणा आहेत व डोक्याला मार लागला होता. त्यामुळे सदरील मृत्यू हा आत्महत्या की हत्या? याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल, असे आष्टी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे म्हणाले.