मुंबई : सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मांडण्यात आलेल्या लक्षवेधीवरती चर्चा करण्यासाठी मंत्री जर सभागृहात उपस्थित राहत नसतील, त्यांना वेळ नसेल तर अशा मंत्र्यांनी आपली पदे सोडावी, मंत्री व्हायला मागेपुढे करणाऱ्या मंत्र्यांनी काम पण करायला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांविषयी मंत्री उदासीन असल्याचा आरोप करीत यासंदर्भात सरकारने कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
नाहीतर पदे खाली करा : लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती लक्षवेधी सुरू असताना अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे चर्चा पुढे ढकलण्यात येत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सरकारने याची गंभीरपणे दखल घेऊन सदर मंत्र्यांना समज द्यावी, अन्यथा जर मंत्र्यांना शक्य नसेल तर त्यांनी आपली पदे सोडावी. अशा प्रकारे सभागृह चालत नाही, सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला सहकार्य करीत आहोत, मात्र मंत्र्यांनाच कामकाजामध्ये रस नसल्याचे अनुपस्थिती वरून दिसून येते आहे. त्याचप्रमाणे मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेल्या अनेक बैठका सुद्धा होत नाहीत, याकडे लक्ष वेध सरकार अत्यंत उदासीनपणे काम करीत असल्याबाबत अजित पवार यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरकार गंभीर- फडणवीस : या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंत्री सभागृहात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र सभागृह उशिरापर्यंत चालल्यामुळे मंत्र्यांना संबंधित प्रश्नांची माहिती घेणे कठीण होत आहे. त्यामुळे अनुपस्थिती झाली असावी, मात्र तरीही मंत्र्यांनी तयारी करून सभागृहात उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यासंदर्भात मंत्र्यांना समज दिली जाईल, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.