बीड - देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र, शुक्रवारी सकाळी संचारबंदी शिथिलतेदरम्यान बीड शहरातील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यावेळी पोलिसांनी नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवून रांगेत उभे राहण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपल्या घरात बसून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.
बीड शहरात एक दिवसाआड संचारबंदी शिथिल केली जात आहे. शहर व परिसरातील भाजी विक्रेत्यांना योग्य त्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यामध्ये भाजी विक्रेत्यांना हातगाड्यांवरून शहरी भागातील नागरिकांना घरपोच भाजीपाला देण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवून भाजी मंडई तसेच बँकांमध्ये वावरावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. संचारबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात जमावबंदीचा आदेशही लागू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी बीड पोलिसांनी नागरिकांना केले.
शुक्रवारी सकाळी बीड शहरात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी काही ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, तात्काळ पोलिसांनी त्याची दखल घेऊन नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवत उभे केले. लॉकडाऊनदरम्यान नागरिकांनी घरात बसून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.