बीड- कोरोनाच्या हाहाकारामुळे ग्रामीण भागातला सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. शहराच्या ठिकाणी आपल्याला चांगली आरोग्य सेवा मिळेल, याचा विश्वास उडत चालला आहे. अशा बिकट परिस्थितीत ज्या त्या भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्याच कोविड सेंटरवर उपचार मिळाले तर कोविड रुग्णांना आपल्या लोकांमध्ये आपण उपचार घेत असल्याचे समाधान मिळते. याचाच विचार करून माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू केले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन आपेगाव सारख्या ग्रामीण भागात 100 खाटांचे कोरोना सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
शहरातील रुग्णालयांवरील ताण होणार कमी-
जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात कोविड सेंटर उभे राहत आहेत. याचा परिणाम म्हणून शहरातल्या रुग्णालयावरील ताण कमी होत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे राजेसाहेब देशमुख यांनी शंभर खाटांचे सेंटर सुरू केल्यामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयावर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
रुग्णांच्या आहाराकडे विशेष लक्ष-
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना उपचारांबरोबरच सकस आहार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी राजेसाहेब देशमुख म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाची थोडी जरी लक्षणे असतील तर दवाखान्यात येऊन योग्य तो उपचार घ्यावा, असे आवाहनही यावेळी देशमुख यांनी केले आहे.