बीड - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. बळींचा आकडाही कमी व्हायला तयार नाही. दुसरीकडे सर्वसाधारण कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे चित्र आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे तसेच सुस्त कारभाराचा हा बळी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. व्हेंटीलेटर उशिरा लावले, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध केली नाही, शिवाय खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन रुग्णालय प्रशासनाने हात झटकल्याचा प्रकार शनिवारी समोर आला.
पालसिंगण (ता. बीड) येथील ५८ वर्षीय व्यक्ती ९ सप्टेंबर रोजी श्वसनास त्रास होऊ लागल्याने शिवाय धाप लागत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वॉर्ड क्र. ९ मध्ये त्यांच्यावर तीन दिवस उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यांचा दोनवेळा स्वॅबही तपासण्यात आला होता. मात्र, दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्यांना वॉर्ड क्र. २ मध्ये हलवून ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती.
प्रकृती खालावल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवणे अपेक्षित होते. परंतु डॉक्टरांनी ऑक्सिजनवरच उपचार सुरु ठेवले. शुक्रवारी रात्री नातेवाईकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे चौकशी केली, तेव्हा प्रकृतीत सुधारणा होत नाही, असे सांगून डॉक्टरांनी त्यांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाईकांनी खासगी दवाखान्यांशीही संपर्क केला. परंतु खाट शिल्लक नसल्याने तेथे सोय होऊ शकली नाही. अखेर औरंगाबादला हलविण्याचा विचार झाला. परंतु त्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकाही जिल्हा रुग्णालय प्रशासन उपलब्ध करुन देऊ शकले नाही. अखेर सकाळी व्हेंटीलेटर लावण्यात आले. मात्र, तोपर्यंत श्वाच्छोश्वासाचा त्रास वाढत गेला आणि सकाळी साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
पालसिंगण येथील रुग्णावर योग्य ते उपचार केलेले आहेत. मी स्वत: प्रत्येक वॉर्ड भेटीत पाहणी केलेली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप केले असावेत. यासंदर्भात अधिक माहिती घेतो. असे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात म्हणाले.
...तर वाचले असते प्राण -
प्रकृती खालावल्यानंतर तज्ज्ञांना बोलावून तपासणी करुन पुढील औषधोपचार करणे गरजेचे होते. मात्र, केवळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. व्हेंटीलेटर लावले नाही. साधे सीटीस्कॅनही केले नाही. उलट खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी हात झटकले. डॉक्टरांनी लक्ष दिले असते तर वडिलांचे प्राण वाचले असते, असे म्हणत मुलाने आक्रोश केला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुविधांचा अभाव, डॉक्टरांचे दुर्लक्ष -
सध्या संपूर्ण प्रशासन कोरोनाविरुध्दच्या लढाईत गर्क आहे. मात्र, नॉन कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. सर्वत्र घाण, अस्वच्छता, रुग्ण रेफरचे वाढते प्रमाण तसेच डॉक्टरांकडून होणारी डोळेझाक यामुळे इतर आजारी रुग्णांच्या जिवाशी अक्षरश: खेळ सुरु असल्याचे चित्र आहे. पालसिंगणच्या रुग्णाच्या बळीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा - बीड: पाणीप्रश्न मिटला मात्र वादळवाऱ्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान
हेही वाचा - एक कोटींची फसवणूक करणाऱ्या परळीतील माऊली मल्टीस्टेटवर गुन्हा दाखल; अध्यक्ष-सचिव फरार