बीड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. रविवारी पुन्हा २६० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ९९ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने आरोग्य प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. तसेच बीड जिल्ह्याचा मृत्यूदर २.८८ टक्के एवढा आहे.
अशी आहे आकडेवारी -
जिल्ह्यात सुमारे २६४१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात २६० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, तर २३८१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. अंबाजोगाई ५२,आष्टी व केज प्रत्येकी १५, धारुर व वडवणी प्रत्येकी २, गेवराई ९, माजलगाव १९, परळी ४, पाटोदा व शिरुर प्रत्येकी ५ व बीडमध्ये १२३ जण कोरोनाबाधित आढळले. बीडमधील १२३ रुग्णांची शनिवारी अँटीजन चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये ३७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २८ हजार ५२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी दोन लाख ८ हजार ९३ जणांचे अहवाल निगेटीव्ह, तर २० हजार ४२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह टक्का १३.१ इतका आहे. तर मृत्यूदर २.८८ इतका असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८ हजार ९८४ इतकी झाली आहे.
वाढीव खाटांची व्यवस्था -
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये कोरोना हातपाय पसरू लागला आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयाच्या सर्व कोविड सेंटरमध्ये खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाची मान्यता घेतलेल्या खाजगी रुग्णालयांमधूनदेखील रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
हेही वाचा - नागपुरात संचारबंदीपूर्वी 2252 कोरोनाग्रस्तांची भर, आजपासून संचारबंदीला सुरूवात