बीड - राज्यभरात विविध शासकीय योजना तसेच बँकांच्या अर्थसहाय्यातून उभारलेले गृह उद्योग मोडकळीस आले आहेत. मागच्या पाच वर्षात विविध 'एनजीओ' तसेच व्यक्तिगत पातळीवर घरीच उभारलेले व्यवसाय पूर्णतः बंद झाले आहेत. अनेक महिलांनी तर बँकांचे कर्ज घेऊन घरगुती व्यवसाय सुरू केले होते. सगळं काही सुरळीत देखील सुरू होतं. मात्र, मार्च 2020 मध्ये सबंध जगावरच कोरोनाचे संकट ओढवले आणि छोट्या उद्योगांची त्रेधातिरपट उडाली आहे. अशा बिकट परिस्थितीत बँकांचे घेतलेले कर्ज फेडायचे तर दूरच मात्र आता जगणं कठीण झालंय, अशी कैफियत बीड येथील महिला उद्योजिका राजश्री निंबाळकर यांनी मांडली आहे.
बीड जिल्ह्यात सामाजिक संस्थांचे मोठे जाळे आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा आधार घेऊन तसेच बँकांचे अर्थसाह्य मिळवून महिलांनी घरगुती व्यवसाय मागील पाच वर्षांमध्ये सुरू केले होते. सुरुवातीच्या काळात म्हणजेच पाच वर्षांपूर्वी सगळं काही सुरळीत सुरू होतं, परंतु मार्च 2020 मध्ये अचानक सबंध जगावर कोरोनाचे संकट आले आणि महिलांच्या पुढाकारातून सुरू असलेले छोटे-छोटे गृह उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत.
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ३ हजार ७५८ नागरिकांना कोरोनाची लागण
ही परिस्थिती तर संपूर्ण राज्याची-
केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोणाच्या संकटामुळे गृह उद्योग करणारे महिला व पुरुष यांची व्यवसायात पीछेहाट सुरू आहे. यामध्ये बीड शहरात राहणाऱ्या राजश्री निंबाळकर यांचे घरीच तीन ते चार गृह उद्योग चालत होते. यामध्ये लेडीज वेअर, ब्युटी पार्लर, महिलांना आरोग्यविषयक सल्ला केंद्र आदी व्यवसायांचा समावेश होता. यावेळी राजश्री निंबाळकर यांनी सांगितले की, मागच्या पाच वर्षात आमच्या गृह व्यावसाय उद्योगांनी चांगली ग्रीप पकडली होती. मात्र कोरोनाचे संकट ओढवलं व आम्ही जे काही गृह उद्योगातून मिळवलं होतं ते सार गमावलं. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत महिला ग्राहक यांना घरी येणे अथवा बोलावणे धोक्याचे आहे. अथवा तशी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देखील नाही. परिणामी व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. माझ्या सारख्या लाखो महिलांनी खाजगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले होते. मात्र आता या सगळ्या परिस्थितीत बँकेचे हप्ते भरणे तर सोडाच आता जगणं कठीण झालंय, अशी प्रतिक्रिया बीड येथील गृह व्यवसाय करणाऱ्या राजश्री निंबाळकर म्हणाल्या.
आता पुन्हा नव्याने उभारावा लागणार व्यवसाय-
मागील पाच वर्षात मोठ्या कष्टाने आम्ही गृह उद्योग उभा केला होता. यामध्ये लेडीज वेअर असेल किंवा ब्युटी पार्लर च्या तीन ब्रँच असतील. त्या सर्व आता मोडकळीला आल्या आहेत. सतत बंद असल्यामुळे ब्युटी पार्लर मधील सौंदर्यप्रसाधने खराब झाली आहेत. याशिवाय लेडीज वेअर या दुकानातील कपडे देखील खराब झालेले आहेत. मागील नऊ-दहा महिन्यापासून सतत लॉक डाऊन असल्याने मनामध्ये कोरोनाची भीती आहे. याचाच परीणाम आमचे व्यवसाय उचललेच नाही. अखेर आता पुन्हा नव्याने गृहउद्योग सुरू करावा लागणार असल्याचे राजश्री निंबाळकर म्हणाल्या. एवढेच नाही तर पाच लाख रुपये खर्च करून लेडीज वेअर सुरू केले मात्र आणलेला माल लॉक डाऊन मुळे विकला गेला नाही. अजूनही कोरोना कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज भरायचे कसे...अन जगायचं कसं? असा सवाल महाराष्ट्रात गृह उद्योग करणाऱ्या महिला व पुरुष यांनी उपस्थित केला असून शासनाकडून काहीतरी मदत झाली पाहिजे, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी नियमावली मात्र विविध स्तरातून तीव्र विरोधच