बीड - उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात कंत्राटी कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाच्या धोरणामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे यावेळी कंत्राटी कामगारांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक एका पत्राद्वारे पुनर्नियुक्ती थांबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे झाले तर राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येईल. सध्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आमच्या नोकऱ्या गेल्या तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. हा निर्णय शासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हेही वाचा - स्वाभिमानीची ऊस परिषद नोव्हेंबरमध्ये? राजू शेट्टींनी सरकारला दिला 'हा' इशारा
हे सरकार प्रत्येक शासकीय कार्यालयाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे कंत्राटी कामगारांवर बेकारीची वेळ येत आहे. शासनाने आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती.