बीड - गृह विलगीकृत असतानाही काही कोरोनाबाधित रुग्णांनी शहरात फेरफटका मारला व शॉपिंग देखील केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हेतर, रुग्णांनी एका लग्नसमारंभाला देखील हजेरी लावली होती. कोरोनाबाधित असतानाही बिनधास्त फिरल्यावरून चौघांसह 49 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकिकडे जिल्हा प्रशासन कोरोना निवारणासाठी सर्वतोपरी काळजी घेत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस कोरोना कक्षामध्ये काम करत आहेत, तर दुसरीकडे मात्र कोरोनाबाधित असताना देखील शहरात फिरून शॉपिंग करणे व लग्नसमारंभाला देखील हजेरी लावणे, अशा चुका नागरिकांकडून केल्या जात असल्याने जिल्हा प्रशासनावर ताण वाढला आहे.
हैदराबाद येथून बीडला प्रवास केलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यावरून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे गृह विलगीकरण करण्यात आले होते. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर शहरातील मसरत नगर येथील एकाच कुटुंबातील 4 जणांसह 49 नागरिकांवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित असताना देखील शहरात फिरणे ही गंभीर चूक आहे. याचा फटका इतर नागरिकांना बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासन हैराण झाले आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.