बीड - ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल रद्द करुन ऑफलाईन परीक्षा घ्या, अशी मागणी करत आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीडमध्ये आंदोलन केले.
महाराष्ट्र सरकारद्वारे महाभरती प्रक्रियेतील सरळ सेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येतात. मात्र, परीक्षा घेत असताना परीक्षा दिलेल्या उमेदवाराला प्रश्नपत्रिका दिली जात नाही. त्यामुळे आम्ही या महापरीक्षा पोर्टलला आमचा विरोध आहे, असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
ऑनलाईन महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्याचे बंद करुन ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र सरकारने परीक्षा घ्याव्यात, अशी आमची मुख्य मागणी आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे हा परिसर दणाणून गेला.
यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सर्व स्पर्धा परीक्षार्थी आंदोलकांनी म्हटले, की एका पदाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, याशिवाय एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा नियोजन समितीमार्फत परीक्षा शुल्क निश्चित करावे, वनरक्षक आणि तलाठी परीक्षेत खूप मोठा गोंधळ असून सदरील परीक्षा लेखी स्वरुपात परत नव्याने घेण्यात यावी. तसेच मेघा पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी. यासह विविध मागण्या बीड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान केल्या.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर विक्रांत वीर, नितीन चव्हाण, जयवंत जगताप, प्रदीप तुपे, दत्ता गवते, सौरभ कोरडे यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले.