बीड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांची उपासमार होत आहे. मजुरांवर उपासमार होण्याची वेळ येऊ नये, यासाठी तत्काळ नरेगाची कामे सुरू करण्याच्या सूचना कामगार आयुक्तांनी दिल्या आहेत.
राज्यात ३५ हजार कामे मंजूर असतानाही त्यातील काहीच सुरू नाहीत, याबद्दलही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न देखील गंभीर आहे. अशा परिस्थितीत गावपातळीवर नरेगाची कामे सुरू करण्याची मागणी होती. यासंदर्भानेच नरेगा आयुक्तांनी नुकताच राज्यभरातील नरेगा उपजिल्हाधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी व यंत्रणेशी संवाद साधला. यात गावागावात नरेगाची व्यक्तिगत कामे तातडीने सुरू करावीत, ज्या ठिकाणी पूर्वी मागणी होती, त्या मजुरांशी संपर्क साधावा, सुरक्षित अंतर ठेवून ४ ते १० मजुरांवर कामे सुरू करावीत असे निर्देश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातही आता अनेक गावात मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार आहेत. ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहेत, असे अनेक नागिरक बीड जिल्ह्यात परत आलेले आहेत. त्यामुळे अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील नरेगाची कामे सुरू करण्याची आवश्यकता आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनानंतर जिल्हा पातळीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील मजुरांचे लक्ष लागले आहे.