बीड - .कोरोनाची महाभयंकर लाट सुरू आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक हैराण होत आहेत. कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन देता यावा यादृष्टीने बीड जिल्ह्यात नवीन 11 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा कार्यारंभ आदेशदेखील दिला असून येत्या दीड महिन्यात या प्रकल्पामधून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर झाला आहे. आज घडीला जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवठा काहीसा सुरळीत असला तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची दमछाक होत असल्याचे वास्तव बीड जिल्ह्यात आहे. हिच परिस्थिती राज्यातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने आरोग्य विभागाच्या संस्था ऑक्सिजन निर्भर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्थानिक आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रक्रियेला आता वेग आला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात 11 नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली.
जिल्ह्यात या ठिकाणी होणार ऑक्सिजन प्लांट
'बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय येथे दोन प्रकल्प, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दोन, लोखंडी सावरगाव रुग्णालयात दोन आणि परळी, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक-एक ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. असे एकूण 11 प्रकल्प बीड जिल्ह्यात उभे राहणार आहेत. यातील प्रत्येक प्रकल्पाची क्षमता दिवसाला 175 जंबो सिलिंडर भरण्याची असणार आहे. सामान्य रुग्णाला एक जम्बो सिलेंडर एक दिवस पुरू शकते. या प्रकल्पांना मंजुरी देऊन कार्यारंभासाठी आदेशदेखील देण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यात कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे', असे जिल्हाधिकारी जगताप म्हणाले.
'योग्य नियोजनामुळे ऑक्सिजन मागणीत घट'
'सध्या बीड जिल्ह्यात तब्बल 1932 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यासाठी 34 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी नोंदवली गेली आहे. मागच्याच आठवड्यात रुग्णसंख्या 1500च्या घरात असताना हिच मागणी तब्बल 45 मेट्रिक टन इतकी झाली होती. मात्र, प्रशासनाने केलेल्या ऑक्सिजन ऑडिट, रुग्ण विलगीकरण करण्याची पद्धत आणि इतर बाबींमुळे ऑक्सिजनची गळती आणि अवाजवी वापर कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा मेळ बसविता येत आहे', असे ऑक्सिजन पुरवठ्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
हेही वाचा - माणुसकीचे दर्शन! कोरोनाग्रस्त गर्भवतीला धीर देण्यासाठी चक्क डॉक्टरने मारली मिठी