बीड - विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा काही तासात थंडावणार आहेत. असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकदाही आले नाहीत. सातत्याने बीडला छोट्या-मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आले नाहीत. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यापूर्वी ते महाजनादेश यात्रेसाठी दीड महिन्यापूर्वी बीडला आले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्हा यांचे संबंध खूप जुने आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे असताना देवेंद्र फडणवीस सातत्याने बीडला यायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यानी आवर्जून हजेरी लावलेली आहे. दीड महिन्यापूर्वी बीड येथे भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस बीडला आले होते. त्यानंतर पुन्हा मी येईल असे, सांगणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी बीडला एकदाही आले नाहीत. याची मोठी चर्चा बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही वाचा - 'काँग्रेस जिंकण्यासाठी नाही तर अस्तित्वासाठी निवडणुकीच्या रिंगणात'
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बीड वगळता पाच मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात येतील अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना होती. जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांची दोन दिवसांपूर्वी परळी येथे जाहीर सभा झाली. त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस येतील, अशी अपेक्षा होती मात्र तेव्हाही फडणवीस बीड जिल्ह्यात आले नाहीत. यापूर्वी दसरा मेळाव्याला भारताचे गृहमंत्री अमित शहा आले होते. तेव्हाही मुख्यमंत्री बीडला आले नाहीत. परंतु तेव्हा ते धार्मिक कार्यक्रमासाठी आल्यामुळे राजकीय भाष्य त्यांनी टाळले होते.
हेही वाचा -पाच दिवसांपासून नाशिकच्या HAL कर्मचाऱ्यांचा संप सुरू; शरद पवारांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा काही तासात थंडावणार आहेत. तरी देखील बीड जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे भाजपचे कॅप्टन तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात प्रचारासाठी आले नाहीत. याची मोठी चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात इतरत्र काही ठिकाणी जाहीर सभा घेतलेल्या आहेत. मात्र, बीडकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. फडणवीस बीड जिल्ह्यात प्रचारासाठी का आले नाहीत याचं कोड बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना पडले आहे.