बीड- जिल्हा रुग्णालयात बुधवारी नागरिकांमध्ये धक्का बुक्की झाली. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला, म्हणून बीड पोलिसांनी बळाचा वापर करत झालेली गर्दी नियंत्रणात आणत असताना सुरुवातीला बाचा-बाची झाली व त्यानंतर मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून सहा जणांना मारहाण करत ताब्यात घेतले आहे. या घटनेमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांना धक्का बुक्की झाली असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. घडला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून फुटेज सर्वत्र व्हायरल झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके म्हणाले, की बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील तीन दिवसासाठी कडक लॉकडाऊन बाबत सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशानुसार काम करत होतोत. बीड जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी अचानक 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुरुवातीला रांगेत उभे राहून सोशल डिस्टन्स पाळत घ्यावी, अशी आम्ही विनंती केली होती. मात्र, त्या ठिकाणी गोंधळ उडाला व काही तरुणांनी आमच्याशी अरेरावी करायला सुरुवात केली. शेवटी सौम्य बळाचा वापर करून आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागली असे वाळके म्हणाले.
जिल्हा रुग्णालयात लसीकरण दरम्यान पोलीस व नागरिकांमध्ये झालेल्या झटापटीचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले आहेत. पोलिसांकडून लस घ्यायला आलेल्या नागरिकांना मारहाण होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीतच हा प्रकार जिल्हा रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे घडत असल्याचे देखील समोर येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.