बीड - सिगारेटची चोरी करणाऱ्या चोरट्याला अवघ्या 48 तासात पकडण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. गेल्या 11 जुलैला शहरातील जालना रोड भागातून सिगारेटचे गोदाम फोडून 6 लाख 90 हजार रुपयांच्या सिगारेट लंपास केल्या होत्या. त्या आरोपीला आज शनिवारी ताब्यात घेण्यात आले.
बिलाल अब्दुल रज्जाक, असे त्या आरोपीचे नाव आहे. बीड येथील व्यापारी महावीर बेदमुथा यांच्या मालकीचे जालना रोडवर सिगारेटचे गोदाम आहे. आरोपी बिलाल याने पाळत ठेवून गुरुवारी पहाटे सिगारेटचे गोदाम फोडून गोदामातील महागड्या सिगारेट लांबवल्या. चोरलेल्या सिगारेटची किंमत 6 लाख 90 हजार एवढी असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी भास्करराव सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणात बिलाल याच्याशिवाय कोणी चोरीच्या कटामध्ये सहभागी होते का? याचा तपास गजानन जाधव हे करत आहेत.