बीड - पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजेच 'बालदिन' म्हटला की लहान मुलांची धम्माल असते. अलीकडच्या काळात काही शाळांमधील लहान मुले नटून थटून शाळेमध्ये येतात. बालदिनाच्या दिवशी विविध उपक्रमांमध्ये मुले सहभागी होतात. मात्र दुसरीकडे, वितभर पोटासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आणि पालावरचे आयुष्य जगणाऱ्या वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांना 'बालदिन' म्हणजे काय? हे माहीतही नसते.
बीड शहरात हॉटेल व रस्त्याच्या कडेला छोट्या-मोठ्या वस्तू विकणारी लहान मुले आजही दिसतात. प्रशासन मात्र कागदावर बालकामगार थांबवण्यासाठी प्रयत्न करते. परंतु, प्रत्यक्षात मात्र ना बालकामगार कमी झालेत ना पालावरच्या त्या चिमुकल्यांच्या आयुष्यातील अंधार कमी झाला आहे. सत्तास्थापनेसाठी ज्याप्रकारे लोकप्रतिनिधी झगडत आहेत, त्याप्रमाणेच जर या चिमुकल्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न झाले, तर या वंचित व उपेक्षितांच्या आयुष्यात प्रकाश येईल. अन्यथा अंधारात चाचपडणाऱ्या त्या निरागस व चिमुकल्यांच्या आयुष्यात असे कितीही बालदिन (चिल्ड्रन डे) येऊन गेले, तरीही त्यांच्या नशिबी अठराविश्व दारिद्र्य राहणार, हे तितकेच खरे आहे.
हेही वाचा... बालदिन विशेष : या दोन बालकांनी मोठे होऊन गाजवला मराठीसह हिंदीचा रुपेरी पडदा
पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, असा प्रवास करणाऱ्यांच्या मुलांची स्थिती बिकट आहे. आई वडिलांच्या नशिबी आलेले अठराविश्व दारिद्र्य अगदी कोवळ्या वयात भोगणाऱ्या या चिमुकल्यांच्या भविष्याचा प्रश्न बिकट आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून चाललेल्या गोंधळात, या निरागस चिमुकल्यांचा किलबिलाट सरकारच्या कानी पडेल का, असा प्रश्न अशावेळी उपस्थित होतो.