बीड- मराठवाड्यातील तीन ज्योतीर्लिंगांपैकी एक प्रभू वैद्यनाथांचे तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ मानले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदीरांमधील दर्शन सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, अनलॉकनंतर हळूहळू राज्यातील मंदिरे उघडण्यास सुरुवात झाली. परंतू परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदीरात अद्यापही नित्यसेवा सुरू करण्यात आल्या नाहीत. कोरोनाची सर्व नियमावली पाळून गाभाऱ्यातील अभिषेक करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रभू वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांनी केली आहे.
वैद्यनाथांच्या स्पर्श दर्शन सेवेला अध्यात्मिक महत्व
प्रभू वैद्यनाथ हे लाखो लोकांचे भक्तीस्थळ आणि शक्तीस्थळ आहे. प्रभू वैद्यनाथांच्या स्पर्श दर्शन सेवेलाच अध्यात्मिक महत्व आहे. देशातील व राज्यातील सर्वच मंदिरातील अभिषेक सेवा सुरू करण्यात आलेली आहे. बाहेरच्या गाभाऱ्यात अभिषेक परवाना न देता निज गाभाऱ्यातील मूर्तीचा अभिषेक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.