बीड : मराठवाड्यामध्ये सध्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच जोरदार तयारीसाठी भाजपकडून मोठी कसरत केली जात आहे. सर्वच नेते पदाधिकारी प्रचार कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे यांना भाषण करण्यासाठी थांबवत स्वत: भाषण केल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे.
कसा घडला प्रकार : भाजपच्यावतीने बीड जिल्ह्यात उभे असलेले उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण संपले आणि पंकजा मुंडे यांना बोलण्यासाठी अनाउन्सींग करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे उठल्या आणि माईक पकडणार तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना थांबवत अगोदर मला बोलायचे आहे असे म्हटले. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण सुरू केले. मी अगोदर बोलणार असे म्हटल्यामुळे पंकजा मुंडे यांना चक्क खाली बसावे लागले. हा प्रकार गेवराई येथे घडला. त्यानंतर पुन्हा दुसरा कार्यक्रम बीड येथे सुरू असताना असाच प्रकार घडला.
बीडच्या कार्यक्रमादरम्यान घडलेली घटना : बीड येथे कार्यक्रम सुरू असताना आधी खासदार प्रीतम मुंडे यांचे भाषण संपले आणि पंकजा मुंडे यांना बोलण्यासाठी अनाउन्सींग करण्यात आले. पंकजा मुंडे उठल्या, मात्र यावेळेसही चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून-बुजून पंकजा मुंडे यांना मीच अगोदर बोलणार असे स्पष्ट केले. त्यावेळीही चक्क चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाषण चालू झाले.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या : यावेळी पंकजा मुंडे या म्हणाल्या की, हा पक्ष श्रेष्ठ आहे, देश श्रेष्ठ आहे, ही भारत माता श्रेष्ठ आहे, त्याच्यानंतर संघटन श्रेष्ठ आहे, आणि नंतर मी आहे. त्यामुळे व्यक्ती पूजन हे भाजपला मान्य नाही. त्यामुळे आमचे संघटन श्रेष्ठ आहे. आमच्या संघटनेमध्ये आमचे अध्यक्ष श्रेष्ठ आहेत. अध्यक्षाचा सन्मान ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. मी आज त्यांना शब्द देते की हे मतदान किरण पाटलांच्याच पारड्यात पडणार असे मत व्यक्त केले.
हेही वाचा : Pankaja Munde Party Change : पंकजा मुंडेंनी केला पक्षप्रवेशाबाबत मोठा खुलासा; म्हणाल्या...