बीड (अंबाजोगाई) - बीड जिल्ह्यात कोवीड रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि अलिकडेच वाढलेल्या मृत्यूदराची दखल घेवून आज केंद्रीय आरोग पथकाने स्वारातीच्या डीसीसीएचच्या आयसीयु सेंटरला भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. या पथकात लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्लीच्या डॉ. रक्षदा कुंडल व एआयआयएमएस, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह यांचा समावेश होता.
बीड जिल्ह्यातील सातत्याने वाढत जाणारी कोवीड रुग्णांची संख्या आणि अलिकडेच वाढलेल्या मृत्यू दर लक्षात घेवून यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकातील डॉ. रक्षदा कुंडल आणि डॉ. अरविंद कुशवाह यांनी कोवीड सेंटरची पहाणी करुन उपलब्ध आरोग्य सेवा बद्दलची माहिती घेतली आहे. आज या टीमने स्वारातीच्या डीसीसीएच सेंटरच्या आयसीयु वॉर्डत जावून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची पहाणी केली. यावेळी डॉ. रक्षदा कुंडल व डॉ. अरविंद कुशवाह या दोघांनी अनेक रुग्णांशी थेट संवाद साधत आपणास आरोग्य सेवा कशी मिळते याची विचारणा केली. डॉक्टर येतात का? तुमच्या अडचणी समजून घेतात का? तुमच्यावर योग्य उपचार होतो का? असे प्रश्न यावेळी त्यांनी विचारले.
डीसीसीएच च्या आयसीयु वॉर्डची पाहणी आटोपल्यानंतर केंद्रीय पथकाने कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत उपचार पद्धती समजावून घेतली. अत्यवस्थ कोवीड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या आयसीयूमध्ये एसी बसवण्याची सुचना या पथकाने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना केली. या सोबतच इतर आवश्यक सूचना ही या पथकाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमला केल्या.
कोवीडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत कोवीड रुग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर, परीचारीका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक करुन या सर्वांच्या परीश्रमापुढे कोवीड जास्त काळ टीकू शकणार नाही असा आशावाद ही या आरोग्य पथकाने व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीची पाहानी करुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपणास चार दिवसांत अहवाल पाठवण्यास सांगितले असून बीड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा विस्तृत अहवाल आपण पाठवणार आहे. या अहवालात मृत्यूदर कमी करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीचा उल्लेख आपण निश्चितपणे करणार आहोत असे या पथकाने सांगितले.
या केंद्रीय पथकाच्या पहाणीवेळेस जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, कोविडचे प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, उप अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. राजेश कचरे, डॉ. अभिमन्यु तरकसे, सहा अधिक्षक डॉ. विश्वजित पवार यांच्यासह इतर अधिकारी सोबत होते