बीड - पिके पदरात पडणार तोच, परतीचा पाऊस सुरु झाला. काढणीला आलेली पिके आठ-दहा दिवस पाण्यात होती. कपाशीचे नुकसान झाले, बाजरीची बुटाडे पाण्यात तरंगत होती. सोयाबीन पाण्यातच जळून गेले. उसनवारी करून केलेल्या पेरणीचा खर्चसुद्धा निघाला नाही, अशी कैफियत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी केंद्रीय पथक प्रमुख व्ही. थिरुप्पुगाझ व डॉ. के. मनोहरन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती. बीडमध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांची पथकाने अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यामध्ये बाग पिंपळगाव ता गेवराई येथील विलास कोटांबे यांच्या बाजरी पिकाची पाहणी केली, तर धोंडराई येथे छाया पूजदेकर यांच्या शेतात कापूस पिकाची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, कापसाच्या लागवडीला व इतर पिकांच्या पेरणीला झालेला खर्च देखील निघालेला नाही. सोयाबीन काढणी सुरुवात होते ना होते तोच, परतीचा पाऊस आला. पुढे महिनाभर पाऊस न थांबल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या तर कापसाची बोंडे नासून गेली. बाजरीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. असेही शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.