बीड - बीड पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यातच शिवसंग्रामकडे तीन पंचायत समिती सदस्य आहेत. यापैकी चौसाळा गणातील पंचायत समिती सदस्य स्वाती किशोर वायसे या बेपत्ता झाल्या आहेत. यामुळे चिडून आमदार विनायक मेटे यांनी स्वाती वायसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या दिराला धमकावले. असे दीर रविराज वायसे यांनी तक्रारीत म्हटले असून मेटे यांच्यासह 40 जणांच्या विरोधात नेकनूर ठाण्यात तक्रार दिली आहे. एवढेच नाही तर बेपत्ता झालेल्या स्वाती किशोर वायसे यांना तत्काळ माझ्या समोर हजर करा, असा दम देखील मेटेंनी दिला असल्याचे स्वाती वायसे यांच्या दीराने तक्रारीत म्हटले आहे. 30 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती निवडी होणार आहेत. तत्पूर्वी पंचायत समिती सदस्य पळवापळवीचे राजकारण बीड जिल्ह्यात सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - पाकचा माजी खेळाडू म्हणतो, 'गांगुलीची ४ देशांच्या मालिकेची कल्पना बेकार'
बीड पंचायत समिती ही एकूण 16 सदस्यांची आहे. यापैकी 8 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर शिवसेनेकडे 3 पंचायत समिती सदस्य होते. त्यापैकी 1 राष्ट्रवादीकडे आहे. तर शिवसंग्रामकडे 3 पंचायत समिती सदस्य होते. याशिवाय भाजपचा 1 पंचायत समिती सदस्य आहे. एकंदरीत मागील अडीच वर्ष बीड पंचायत समितीवर शिवसंग्रामचे शिवसेनेच्या मदतीने वर्चस्व होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या 2 सदस्यांनी देखील शिवसंग्रामला पाठींबा दिला होता. आता नव्याने सभापती निवडीमध्ये शिवसंग्रामला शिवसेनेला पाठींबा देऊन राष्ट्रवादी कॉग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे होते. मात्र, शिवसंग्रामच्या चौसाळा गणातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य स्वाती वायसे यांनी आपला सवतासुभा मांडला आहे. त्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अजून उघड नाही. आता 16 पैकी ... पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्या घडामोडीमुळे बीड पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. तर किंगमेकर असणारे आमदार विनायक मेटे या प्रकारामुळे हतबल झाले आहेत. याबाबत नेकनूर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन पुंडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे आमदार विनायक मेटे यांच्या विरोधातली तक्रार आलेली आहे. त्यानुसार संबंधित पंचायत समिती सदस्यांच्या कुटुंबीयांना आम्ही आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. काही अडचण असेल तर आम्हाला कळवा असे आम्ही त्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - ...मग झेड सुरक्षा कशाला, निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
या सर्व प्रकारांमुळे चौसाळा गणातील पंचायत समिती सदस्य स्वाती वायसे यांच्या दिराला आमदार विनायक मेटे यांनी धमकी दिली. अशी तक्रार स्वाती वायसे यांचे दिर रविराज वायसे यांनी पोलिसात दिली आहे. याशिवाय आमदार मेटे यांच्याकडून धोका असून मला संरक्षण द्या, अशी मागणी देखील रविराज वायसे यांनी तक्रार अर्जात केली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात आम्हाला त्रास झाला. तर पुढील कारवाई करावी असेही रविराज वायसे यांनी नेकनूर पोलिसांना लेखी दिले असल्याचे रविराज वायसे म्हणाले.