बीड : बीड जिल्हा म्हटले की, रोज चर्चेत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. दररोज काही ना काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत. मंगळवारी धुलीवंदन सर्वत्र सुरू होते. यावेळी अशोक शेजुळ हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मात्र त्यांच्या मागावर असलेले काही लोकांनी पाठीमागून येऊन राॅडच्या साह्याने हाणमार केली. त्यामध्ये अशोक शेजुळ यांचा एक हात फॅक्चर झाला आहे. दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत, अशी माहिती अशोक शेजुळ यांनी दिली. मात्र या प्रकरणांमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
गुंडांच्या मदतीने हल्ला केल्याची तक्रार : माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह त्यांच्या पत्नी मंगल सोळुंके व रमेश टवानीसह सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी आमदार प्रकाश सोळुंके यांच्या संस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच आमदार प्रकाश सोळुंके यांनी त्यांच्या गुंडांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केल्याची तक्रार शेजुळ यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण : माजलगाव येथील प्रकाश सोळुंके यांच्या ताब्यात असलेल्या सूतगिरणीत रूपांतरित केलेल्या माजलगाव सर्व उद्योग औद्योगिक संस्थेत झालेल्या करोडोच्या गैरव्यवहार प्रकाराची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक शेजुळ यांनी मागील महिन्यात शासनाच्या विविध विभागाकडे दाखल केली होती. त्याच अनुषंगाने काल मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात सहा लोकांनी अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
गुन्हा दाखल करण्यात आला : त्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय व हात फॅक्चर झाले. या हल्ल्याप्रकरणी आमदार प्रकाश सोळुंखे यांचा हात असल्याचा आरोप अशोक शेजुळ यांनी केला होता. त्यानुसार रात्री उशिरा शेजुळेंच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार प्रकाश सोळंके मंगल सोळुंके रामेश्वर तवाणी यांच्यासह सहा लोकांवर भादवी 307,120 बंद कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास माजलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ करत आहेत.