बीड - बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणायला दुचाकीवर गेलेल्या भावाचा ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर, दुचाकीवरील चुलत भाऊ गंभीर जखमी आहे. शनिवारी दुपारी बहिणीचे लग्न होते. लग्नाच्या केवळ चार तास अगोदर ही दुर्दैवी घटना घडल्याने लग्न घरी शोककळा पसरली आहे.
सचिन शिवाजी चव्हाण (वय २३, रा. शेरी तांडा, ता. धारूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सचिनची बहिण अंजली हिचा विवाह होता. लग्नात फटाके नसल्याचे सचिनच्या ऐनवेळी लक्षात आले. त्यामुळे तो चुलत भाऊ नितीन आप्पासाहेब चव्हाण (वय २२) याला सोबत घेऊन दुचाकीवरून (एमएच २० एफ ६८९५) सिरसाळा येथून फटाके आणण्यासाठी निघाला. वाटेत परळी-बीड रोडवरील तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपातून डीझेल भरून बाहेर पडत असलेल्या रिकाम्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात सचिनचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन हा गंभीर जखमी झाला. जखमी नितीनवर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तांड्यावरील विवाह सोहळा साध्या पद्धतीने उरकण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सचिनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ-
सचिनचे वडील शिवाजी चव्हाण हे औरंगाबादला शिक्षक आहेत. त्यांना तीन मुली आणि सचिन हा एकुलता एक मुलगा होता. हे सर्व कुटुंब औरंगाबादला राहत होते. लॉकडाऊनच्या काळात ते गावाकडे तांड्यावर आले होते. नुकताच सचिनचा बी.ए.एम.एस साठी प्रथम यादीत क्रमांक लागला होता. असे नातेवाईकांनी सांगितले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना