बीड-भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतीत माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांची तसेच कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या”.
प्रीतम मुंडेंनी पोस्ट केला होता व्हिडिओ!
दरम्यान २४ एप्रिलला शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.
धनंजय मुंडे यांची पोस्ट
ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या @Pankajamunde ताई.
खासदार प्रीतम मुंडेही विलगीकरणात
खासदार प्रीतम मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. “त्यात त्यांनी म्हटले होते की, मी सगळ्यांना आवाहन करते, की फक्त अरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला कोरोना नाही, या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणं असतील, तर त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत आहे”, असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं होते.