बीड- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता घोषित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळाव्यातून बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळता इतर पाचही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. मात्र, या उलट भाजपकडून अद्याप बीड जिल्ह्यातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा अधिकृतरित्या झालेली नाही. भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा फटकादेखील भाजपला बसू शकतो. माजलगाव विधानसभा मतदार संघात आर. टी. देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, तेथे मोहन जगताप, रमेश आडसकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या जवळचे व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनीही माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश सोळंके रिंगणात उतरले आहेत. 2014मध्ये भाजपचे आर. टी. देशमुख यांनी प्रकाश सोळंके यांचा 37 हजार मतांनी पराभव केला होता. आर. टी. देशमुख हे पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वास म्हणून ओळखले जातात. त्यांची उमेदवारी मिळू नये यासाठी अनेक कारणे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून सांगितली जात आहेत. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाच्या बाहेरचे राहणारे आहेत. भाजप आतातरी माजलगाव मतदारसंघातील व्यक्तीला उमेदवारी देणार का? असा सूरही मागील दोन दिवसांपासून माजलगाव मतदारसंघात आळवला जात असल्याने भाजप रमेश आडसकर यांना उमेदवारी देईल का? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे. दुसरीकडे आर. टी. देशमुख यांच्याबद्दल माजलगाव मतदारसंघात रोष आहे. पुन्हा भाजपने जर आर. टी. देशमुख यांना उमेदवारी दिली तर माजलगाव मतदारसंघात भाजपला आपली एक सीट गमवावी लागेल, असा प्रचारदेखील भाजपची उमेदवारी मागणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांकडून केला जात आहे. एकंदरीत ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भाजप काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- विधानसभा धुमशान: भिवंडीत 'राष्ट्रवादी साफ, काँग्रेस हाप'मुळे शिवसेना जोमात
रमेश आडसकर यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा झाली. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये दाखल झालेले मोहन जगताप हे देखील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत. याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हे देखील माजलगाव विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. परंतु, ओमप्रकाश शेटे यांचा राजकीय अभ्यास नाही. या सगळ्या परिस्थितीत ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आवाहन बीड भाजप समोर आहे. नेमका याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला माजलगाव विधानसभा मतदारसंघात होऊ शकतो, अशी परिस्थिती माजलगाव विधानसभा मतदारसंघात आहे.