बीड- जिल्हा पुरवठा विभागातील एका प्रकरणात सोयीचा अहवाल देण्यासाठी एका अव्वल कारकुनाकडून पाच लाखांची लाच घेण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बी. एम . कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात अखेर गुरुवारी कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
बीड येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दोन फेब्रुवारी रोजी बी. एम . कांबळे व महादेव महाकुडे यांना लाच घेताना अटक केली होती. बीड तहसीलमधील धान्य घोटाळ्यात सोयीचा अहवाल देण्यासाठी संजय हंगे या कारकूनाकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. न्यायालयाने या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर बी. एम. कांबळे कार्यालयात रुजू झाले होते. त्यासोबतच त्यांनी कामकाजही सुरू केल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी स्वतःच्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना पकडला गेल्याने राज्य स्तरावर या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे कांबळे यांच्या सेवानिवृत्तीला एक वर्षाचा कालावधी उरला होता.