बीड - लॉकडाऊनमुळे सर्वच वयोगटातील नागरिकांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक झाला आहे. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडून आत्महत्या, कौंटुबिक हिंसाचार आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्या प्रकारातून एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, अशा व्यक्तींना आधार देण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 'प्रोजेक्ट सहाय्यता' नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा स्तरावर एक हेल्पलाईन सुरू केली आहे.
हर्ष पोद्दार यांच्या या उपक्रमाबाबत 'ईटीव्ही भारत' ने त्यांची घेतलेली विशेष मुलाखत...
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना तीन महिने घरात बसावे लागले. या काळात अनेकांना रोजगार नव्हते तर अनेकांचे असलेले रोजगार गेले. अशा परिस्थितीत डिप्रेशनमध्ये जाणाऱ्यांना समुपदेशन व इतर प्रकारचा मदतीचा हात देण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पुढाकार घेतला आहे. बीड जिल्ह्याची लोकसंख्या 25 ते 28 लाखांच्या जवळपास आहे. कोरोना संकट काळात अनेक कुटुंबांना आर्थिक तसेच इतर समस्यांना सामोरे जावे लागलेले आहे. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी थोडावेळ लागणार आहे. मात्र, तोपर्यंत अनेक व्यक्ती मानसिक व सामाजिक परिस्थितीमुळे खचून जातील. त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव होऊ न देता, त्यांचे कोणीतरी ऐकून घेणारे आहे, ही भावना त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी बीड पोलीस दल काम करत आहेत.
या नागरिकांसाठी 'प्रोजेक्ट सहाय्यता' नावाने कक्ष स्थापन केला आहे. या प्रोजेक्ट सहाय्यता उपक्रमाअंतर्गत 8830217955 हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. या कक्षांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर व पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 24 तास ही सेवा राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.
ज्या व्यक्तींचे यापूर्वीचे कुठलेच क्रिमिनल रेकॉर्ड नाही, अशा व्यक्ती देखील नैराश्यातून चुकीचे पाऊल उचलतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडू नयेत, या उद्देशाने पोलीस विभागाने पुढाकार घेऊन हा प्रोजेक्ट सुरू केला असल्याचे पोद्दार म्हणाले. त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक होत असून दोन दिवसांपासून हा उपक्रम सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.