बीड- हैदराबाद येथे पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. बीड पोलिसांनी सोमवारपासून ऑपरेशन कवच (बडीकॉप) मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. महिलेवर कामाच्या ठिकाणी अन्याय व अत्याचार होत असेल तर पोलिसांनी दिलेल्या हेल्प लाइनवर कॉल करून माहिती दिल्यास तात्काळ संबंधित महिलेच्या तक्रारीची दखल घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई केली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता. बीड पोलिसांनी या घटनेपासून धडा घेतला आहे. महिला अत्याचाराच्या संदर्भातील घटनांची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात तात्काळ घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला कळवून योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात देखील बीड जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सूचना दिल्या आहेत.
घराबाहेर पडणाऱ्या महिलांचा बनवणार 'व्हॉट्सॲप' ग्रुप-
नोकरी अथवा इतर कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर पडणाऱ्या महिलांचा एक 'व्हॉट्सॲप ग्रुप' बनवण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला एक महिला कर्मचारीही नेमण्यात आली आहे. महिला अत्याचारांच्या घटनांवर योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी त्या नेमलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर देण्यात आली आहे. याशिवाय महिला अत्याचाराच्या संदर्भात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन कवच या मोहिमेअंतर्गत 02442- 222333 व 02442- 222666 हा हेल्पलाइन नंबर पोलिसांनी जाहीर केला असल्याची माहिती यावेळी पोद्दार यांनी दिली.