बीड - जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ" या महिला मेळावा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. प्रितम मुंडे या होत्या.
बेटी बचाव आणि बेटी पढाव हे नेमके काय आहे? तसेच याची सुरुवात का झाली? तर याचे कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. तेव्हापासून बेटी बचाव आणि बेटी पढावची सुरुवात झाली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी 'लेक वाचवा, राष्ट्र वाचवा' आंदोलन उभारले आणि त्याचबरोबर 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना राबवण्यास सुरुवात केली. मुलीचा जन्म नाकारण्याची जी मानसिकता होती ती या योजनेमुळे कमी झाली आहे. आज जिल्ह्यात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे ९३७ मुली इतका झाला आहे, ही निश्चितच भूषणावह बाब आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
महिला संरक्षण, सबलीकरणांवर भर
महिला या पूर्वीपासूनच फार बलशाली होत्या आणि त्या पुरुषांपेक्षाही वरचढ होत्या. याच कारणामुळे त्यांना मागे ठेवण्यात आले. स्त्रियांना कमी लेखण्याच्या या सगळ्या रूढी पुसून काढण्याचे काम सध्या मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक योजनांच्या माध्यमातून करत आहोत. स्त्री जन्मदर वाढला, त्यांचे शिक्षण, पोषण झाले, आता त्यांचे आणि सबलीकरण होणे आवश्यक आहे आणि हेच माझे ध्येय आहे असे मुंडे यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, महिला आयोगाच्या सदस्या गया कराड, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ. शालिनी कराड, दीनदयाळ बॅकेच्या अध्यक्षा शरयू हेबाळकर, नगरसेविका उमाताई समशेट्टे, महिला बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान आदी यावेळी उपस्थित होत्या. तसेच शहरातील महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.