बीड - मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा होरपळत आहे. अशा परिस्थिती भविष्यातील संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने वैयक्तिक विहिरींना मंजुरी देण्याचे काम केले आहे, अशी माहिती बीड येथील रोहयो व फलोत्पादन विभागाच्या वतीने फळे व भाजीपाला उत्पादकांसाठी आयोजित कार्यशाळेत फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.
दहा हजार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विहिरींची नोंदणी ऑनलाईन नाही तर ऑफलाईन करून घेण्याच्या सूचना देखील यावेळी मंत्री क्षीरसागर यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
एकीकडे पाण्याने जीव जात आहेत तर मराठवाड्यात पाण्याविना जीव जात आहेत - जयदत्त क्षीरसागर
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, की निसर्गाची किमया न्यारी आहे. एकीकडे भरभरून देतो तर एकीकडे पाठ फिरवतो. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याने जीव जात आहेत तर मराठवाड्यात पाण्याविना जीव जात आहेत. अशा परिस्थितीत काही ठोस कामे घेऊन मदत करण्याच्या उद्देशाने अभिनव प्रयोग करून शेतकऱ्यांना नेमके काय हवे यासाठीचा प्रयत्न करत आहोत. राज्यावर पाण्याचे संकट असताना मराठवाडा कोरडा आहे. या मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पुढचा विचार करून हे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. मागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना आहे. अस्तरीकरण, ठिबक सिंचन ही कामे ऑनलाईन न करता शेतकऱ्यांच्या एका अर्जावर मंजूर करावीत, असा आदेशच यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाभरातील बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले तर फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भीमराव धोंडे, आमदार आर. टी. देशमुख, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.