बीड - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला मंगळवारी सहा वर्ष पूर्ण झाले. तरीही त्यांच्या हल्ल्यामागील सूत्रधार मोकाट आहेत, तेव्हा त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, यासाठी बीड अंनिसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
"शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्ट 2019 रोजी सहा वर्ष पूर्ण होत असून खुनाच्या तपासात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली."
समाजात विवेकवाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींना धर्मांध शक्तीकडून रोखण्याचा व संपवण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात अनिंस, समविचारी संस्था व संघटना एकत्र येऊन लढा देत आहोत. 6 वर्षांपूर्वी नरेंद्र दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यासारख्या परखडपणे मत मांडणार्या व्यक्तींना संपवण्यात आले. या कटा मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या राज्य समन्वयक सविता शेटे यांनी केली.
यावेळी सविता शेटे यांच्या समवेत मधुकर जावळे, अंबादास आगे, करुणा टाकसाळ, शुभांगी कुलकर्णी, मोहन जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले निवेदन सुपूर्त केले.