बीड - जिल्ह्यातील शेतकरी सध्या पीक कर्जासाठी बँकांकडे हेलपाटे मारत आहेत. अनेक अडथळ्यांना बळीराजा सामोरे जात असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू देणार नाही, असे आश्वासन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यामुळे तात्पुरता का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची प्रकरणे मार्गी लावणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी आदेश दिले आहेत. नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अग्रणी बँकेच्या प्रमुखांसह इतर राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांची पालकमंत्री मुंडे यांनी बैठक घेऊन पीक कर्जाबाबत सूचना केल्या आहेत.
खरीप हंगाम २०२० - २१ मध्ये पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे कर्ज मिळत नाही त्यांना तलाठ्यांमार्फत आपली माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती आधार कार्ड, पॅन कार्ड, गावचे नाव, मोबाईल क्रमांक, शेतकऱ्याचा एकूण लाभक्षेत्र यासह सविस्तर माहिती विहित नमुन्यामध्ये सादर करण्याबाबत आवाहन केले आहे.
मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना निर्देशित केल्याप्रमाणे सदर आदेशान्वये, संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन ते तलाठी - मंडळ अधिकारी यांचेमार्फत मार्गी लावून त्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गावातील सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा बँकेच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्जासाठी अपात्र ठरवले असल्यास त्याचे अपात्रतेचे कारण लेखी स्वरूपात देण्याचेही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यासाठी आवश्यक कारवाई करावी. तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.