अंबाजोगाई (बीड) - अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून स्थलांतर केलेला ऑक्सिजन प्लांट आज (मंगळवार) कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्लांटद्वारे दर दिवसाला 288 जम्बो सिलिंडर इतका ऑक्सिजन हवेतून वेगळा करून निर्माण होणार आहे. शिवाय याद्वारे रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या 40 टक्के ऑक्सिजन निर्माण होणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.
या ऑक्सिजन प्लांटमुळे रुग्णालयाला लागणारा 40 टक्के ऑक्सिजन मिळेल, उर्वरित ऑक्सिजनचा सध्या विविध माध्यमातून पुरवठा सुरू असून तो ऑक्सिजन देखील इथेच निर्माण केला जावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तर परळी येथील औष्णिक विद्यूत केंद्रात कार्यरत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे शिफ्टिंग करणे शक्य नाही. मात्र, याठिकाणी सिलिंडर फिलिंग युनिट उभारून अन्य ठिकाणी सिलिंडर पुरवठा केला जाऊ शकतो, याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित असलेल्या मंत्री प्राजक्त तनपुरे यांना केली आहे.