बीड - कोरोना विषाणूच्या संदर्भाने राज्य सरकारने खबरदारी म्हणून, सुरुवातीला केवळ शहरी भागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रविवारी सायंकाळी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील शाळादेखील 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची सूचना संबंधित शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
हेही वाचा - कोरोना संबंधी अफवा, बीड जिल्ह्यातील दोघांना आष्टीत अटक
रविवारी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांसंदर्भात तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शाळा देखील 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात सूचना रेखावार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. शनिवारी राज्य सरकारने केवळ शहरी भागातील शाळा बंद ठेवाव्यात असे म्हटले होते. मात्र, कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून, आता ग्रामीण भागातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे.
रविवारी रात्री उशिरा पुन्हा जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावलेली असून, यामध्ये एसटी बस वाहतूक तसेच पुढील काही महिन्यांत असलेल्या लग्नसमारंभासंदर्भात गर्दी होऊ नये, यादृष्टीने काही नियम बनविण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी 144 कलम बाबत देखील निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे.