बीड - बीड लोकसभा मतदार संघाचे मतदान गुरुवारी होत आहे. यासाठी बीड जिल्हा प्रशासन याचबरोबर जिल्हा पोलीस दल सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बीड जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय जे मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्या केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पांडे यांनी सांगितले.
यावेळी अस्तिक पांडे म्हणाले, की बीड लोकसभा मतदारसंघात एकूण ३७ उमेदवार निवडणुक लढवत आहेत. शांततेत निवडणुका पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. ९ हजार ३०० अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ९५२ राखीव कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात पोलिसांची विशेष कुमक ठेवण्यात आली आहे. यावर्षी यावेळी जिल्ह्यामध्ये एकूण २ हजार ३११ मुळ मतदान केंद्र आहेत. तर १४ सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत. एकूण शहरी भागात ७६१ तर ग्रामीण भागात १ हजार ५६४ याप्रमाणे विभागणी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक पांडे यांनी दिली.
मतदान केंद्रावर शिस्तीत मतदान करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर काहीही समस्या उद्भवली तर १९५० हा टोल फ्री क्रमांक सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात ३७ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांची उपस्थिती होती.