बीड- बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ठिक- ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बीडकरांनी अभिवादन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तगडा ठेवण्यात आला होता. यावेळी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सवासाठी काही मर्यादा घालून दिलेल्या असल्या तरी सर्व नियमांचे पालन करत शिवभक्तांनी आपल्या राजाला शिस्तीमध्ये अभिवादन करून, शिवजयंती अतिशय साधेपणाने साजरी केली. बीड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या, विशेष म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी केली होती.
सर्वत्र शिवरायांचा जयघोष
बीड जिल्ह्यातील केज, धारूर, माजलगाव, गेवराई या ठिकाणी मुख्य रस्त्यावर शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. डोक्याला भगवे फेटे बांधून शिवभक्त घराबाहेर पडल्याचे चित्र सर्वत्र होते. केज येथे विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. याशिवाय आष्टी, पाटोदा व शिरूर कासार या ठिकाणी सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अभिवादन करण्यात आले.
तगडा पोलीस बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बीडकरांना शिस्तीत व नियमांचे पालन करत महाराजांचे दर्शन घेण्यासंदर्भात आवाहन करत असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पोलिसांच्या आवाहनाला शिवभक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले.