बीड - दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपी अविनाश राजुरे याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सरवरी यांच्या न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री बीड तालुक्यातील नेकनूरजवळ 22 वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला करून आरोपी फरार झाला होता.
रविवारी रात्री उशिरा नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलिसांनी आरोपीला अटक करून बीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर सोमवारी बीड पोलिसांनी आरोपी अविनाश राजुरे याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आणले असता, न्यायालयाने आरोपीला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू -
पीडित मुलीचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी न्यायालयात केला. बीड पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आरोपी अविनाश राजुरे याला आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.
हेही वाचा - बीड अॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीच्या देगलूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या