बीड - ज्यांनी स्वतःच्या दिवंगत आईने दिलेला शब्द सत्तेसाठी पाळला नाही, ते मतदारांशी व भाजपशी काय प्रामाणिक राहणार? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अक्षय मुंदडा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जे आधीपासूनच आतून भाजपचे होते. ते आज उघड गेले तर नवल काय? अशा शब्दात सोनवणे यांनी मुंदडा परिवारावर निशाणा साधला. सोमवारी मुंदडा परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जिल्हापरिषद निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्याने राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्यासाठी केलेल्या फोनच्या रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत कोणी कधी हात वर केला ते ज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात केलेल्या पोस्ट आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान केलेली भाषणे कोणत्या आशयाची होती, त्याचे व्हिडियो आहेत. मतदाना दिवशी अंबाजोगाईत काय झाले हे पाहिले. २३ मे ला लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झालाही नव्हता तोच दुपारी इफ्तार पार्टीचे निमंत्रण जात होते. राष्ट्रवादीच्याच विधानसभेच्या उमेदवारातर्फे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याच्या खुशीत दुसऱ्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करावे का? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - अखेर मुंदडा कुटुंबीय भाजपात दाखल; केजमध्ये संगीता ठोंबरेंचे तिकीट कापले?
"लोकसभेचा निकाल लागून महिना पण झाला नव्हता तोच मतदारसंघातील कार्यक्षम पदाधिकाऱ्यांचे द्वेषापोटी राजीनामे घेतले व नवनियुक्त्या केल्या. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती पोटनिवडणुकीत उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी हे नवनियुक्त पदाधिकारी किंवा त्यांचे नेते उपस्थित का नव्हते? हा प्रश्न कोणी विचारणार नाही, पण उगाच माहिती न घेता मॅनेज झाल्याचे आरोप करायचे. जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली अन् त्यासाठी तुम्ही जिल्हाध्यक्षांना दोषी ठरवता? आपली आमदारकी वाचवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोण कोणासोबत तडजोडी करत होते हे सामान्यांना माहित नसेल पण जाणकारांना नक्की माहित आहे," असे सोनवणे म्हणाले.
हेही वाचा - बीडमध्ये संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या आखाड्यात, राहुल वाईकरांचे नाव चर्चेत
एक दुसऱ्यावर चिखलफेक-
केज विधानसभा मतदारसंघात मागील दोन दिवसात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुंदडा परिवार भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी जोरदार निशाणा साधत मुंदडा परिवाराचे राष्ट्रवादीवरील बेगडी प्रेम असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे अक्षय मुंदडा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आम्हाला पवार साहेबांपासून तोडले आहे, असा गंभीर आरोप अक्षय मुंदडा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.