बीड - जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामाला राष्ट्रवादीचे सरकार असताना अजित पवारांच्या माध्यमातून निधी देण्यात आला होता. मागच्या ५ वर्षांत ते काम पूर्ण होऊ शकले नाही. कदाचित नियतीलाही भाजपच्या हाताने उद्घाटन मान्य नसावे. आता ज्यांनी इमारतीसाठी निधी दिला होता, अशा आमच्या नेत्यांच्या हस्ते लवकरच जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन करू, असे बीड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष बजरंग सोनवणे म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची सुत्रे बुधवारी शिवकन्या सिरसाट यांनी स्वीकारली. उपाध्यक्ष पदाचा पदभार सोनवणे यांनी सोमवारीच घेतला होता. बुधवारी अध्यक्ष उपाध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष शिवकन्या सिरसाट यांनी रखडलेली कामे पूर्ण करण्याला प्राधान्य असेल असे सांगितले. मागच्या काळात सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली अनेक कामे बाजुला ठेवली गेली. आता त्याला प्राधान्य दिले जाईल. जिल्हा परिषद इमारत आणि पंचायत समिती इमारतींची कामे तातडीने पूर्ण केली जातील. सामान्यांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करणे यालाच प्राधान्य असेल, असे बजरंग सोनवणे म्हणाले.