बीड - लोकसभेसाठी गुरुवारी मतदान होताच निवडून कोण येणार यावर सट्टे बाजार सुरू झाला आहे. एवढेच नाही तर सट्टा बाजारात कोट्यवधींच्या उलाढाली छुप्या पद्धतीने होऊ लागल्या आहेत. दुष्काळाची छाया असलेल्या बीडमधील सट्टा खेळणारे आकडेमोड करून निकालाचा अंदाज लावत आहेत.
विशेष म्हणजे या निवडणूक सूत्रांच्या माहितीनुसार सट्टा बाजारात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे सर्वात महागडे असल्याचेही सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे व भाजपच्या प्रीतम मुंडे या उमेदवारांवर करोडो रुपयांचा सट्टा बाजार लागलेला आहे. मात्र, अद्यापपर्यंत पोलीस दप्तरी सट्टा बाजारावर कारवाई केल्याची एकही नोंद नाही. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. तोपर्यंत चर्चेला ऊत आला आहे. अनेक कार्यकर्त्यांचा दिवस केवळ आकडेमोड करण्यामध्ये जात आहे. याशिवाय इतर तालुक्यातील कार्यकर्ते हे पाहुणे मंडळींना फोन करून तुमच्याकडे कोणाला मत अधिक पडले, अशी विचारणा करून आकडेमोड करत आहेत. तर अनेक मोठ्या उद्योजकांनी कोण निवडून येणार यावर लाखो रुपयांची पैज लावल्याचे बोलले जात आहे.
या दोन प्रकारे लावला जातो सट्टा-
सट्टा घेणाऱ्या व्यक्तींकडून सध्याचा भाव ठरविला जातो. ज्या उमेदवारावर सट्टा लावायचा त्याचा भाव सट्टा लावणाऱ्याला सांगितला जातो. त्यानंतर १ लाख रुपयाला ५० हजार किंवा १ लाख रुपयावर एकच लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात एक लाखाला एक लाख रुपये, अशी ऑफर सट्टा बाजारात सुरू आहे. ही माहिती सट्टा बाजारातील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे. बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले की, सट्टा बाजार चालविणांऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. सट्टा खेळताना अथवा कुठेही लाखो रुपयांचा सट्टा लावताना कोणी आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. त्यामध्ये वापरलेले पैसे कुठून आले, याचीही चौकशी करू, असे कबाडे यांनी सांगितले.