बीड - विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला दुचाकीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रिक्षाचालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्यालगतच्या खड्डयात उलटली. यामध्ये एका विद्यार्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही लिंबागणेश-पिंपरनई रस्त्यावर ही घटना घडली.
लिंबागणेशच्या उत्तरेला पिंपरनई हे गाव आहे. या गावासह परिसरातील काही गावचे विद्यार्थी लिंबागणेश येथील भालचंद्र महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेवून जाणार्या रिक्षाला (एम.एच.23 ए.एफ.2995) पाठीमागून आलेल्या दुचाकीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले अन् रिक्षा रस्त्यालगतच्या खड्डयात जावून उलटला. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाले. जखमींमधील एका विद्यार्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महादेव कारभारी वायभट (18, रा.पिंपरनई, ता.बीड) असे अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मयुरी दाभाडे(18), कृष्णा बागडे (18) व गणेश दिगंबर वायभट (18, सर्व रा.पिंपरनई) असे जखमींची नावे आहेत. जखमींवर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मृत महादेवचा चुलत भाऊ सतिश पांडुरंग वायभट यांच्या तक्रारीवरुन रिक्षाचालक अंकुश ऊर्फ बप्पा दाभाडे (रा.पिंपरनई) याच्याविरुद्ध रुग्णालय चौकीत तक्रार करण्यात आली आहे.