बीड - जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचत आहे. माजलगाव मतदार संघात पतीच्या विजयासाठी पत्नी 'डोअर टू डोअर' जाऊन मतदारांशी संवाद साधत असल्याचे चित्र दिसत आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अर्चना आडसकर गावा-गावांत जाऊन महिला मतदारांची संवाद साधत आहेत.
माजलगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांचे तिकीट कापून रमेश आडसकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. रमेश आडसकर यांनी माजलगाव विधानसभा मतदार संघातील धारूर, वडवणी व माजलगाव या तालुक्यात कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. असे असले तरी रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना आडसकर या देखील माजलगाव मतदार संघात घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संवाद साधत आहेत. 'माझ्या पतीला साथ द्या, आम्ही मतदार संघाचा विकास करून दाखवू', असे आवाहनही अर्चना आडसकर महिला मतदारांना करत आहेत.
हेही वाचा - कुख्यात गुंड गुज्जर खानच्या आवळल्या मुसक्या; दरोडा प्रतिबंधक विभागाची कारवाई
माजलगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिली आहे. सोळंके हे प्रचाराला लागले असून माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न व रस्त्यांची अपूर्ण कामे तसेच सिंचन प्रकल्पांचा अभाव यावर सोळंके टीका करत आहेत. तर दुसरीकडे रमेश आडसकर यांनी माजलगाव विधानसभा मतदार संघात मूलभूत सुविधा बरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या संदर्भाने द्याव्या लागणाऱ्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास रमेश आडसकर माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना देताना पाहावयास मिळत आहेत.
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करावे, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अर्चना आडसकर यांनी केले आहे. माजलगाव मतदारसंघात अर्चना आडसकर यांनी उपळी येथे गुरुवारी प्रचार सभा घेतली.
हेही वाचा - महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईंशिवाय दुसरी सक्षम महिला दिसत नाही - प्रीतम मुंडे
बंडखोरी रोखण्यात आडसकर यशस्वी
माजलगाव विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांची उमेदवारी नाकारल्यानंतर रमेश आडसकर यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, याच दरम्यान भाजपमधील मोहन जगताप यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हस्तक्षेप करत मोहन जगताप यांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी गळ घातली. त्यानंतर मोहन जगताप यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. याचा लाभ रमेश आडसकर यांना होऊ शकतो.
हेही वाचा - स्वतःला कार्यसम्राट म्हणणाऱ्या आमदाराला हद्दपार करा - माजी आमदार पंडित