बीड - आजपर्यंत राजकारणात कार्यकर्त्यांमध्ये आणाभाका घेऊन शर्यती लावल्या जायच्या. मात्र आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे यांनी अंबाजोगाई येथे शिवस्वराज्य यात्रेमध्ये भर सभेत शपथ घेतली आहे. 'जोपर्यंत परळी व केज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा घालणार नाही', अशी शपथ अमोल कोल्हे यांनी केज विधानसभा मतदारसंघातील जनतेला साक्षी ठेवून घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शनिवारी शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली होती. यावेळी अक्षय मुदडा हे खासदार कोल्हे यांना फेटा बांधायला गेले होते. मात्र कोल्हे यांनी फेटा बांधून घ्यायला नकार दिला. त्यानंतर भर सभेत त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे व केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाल्याशिवाय मी बीड जिल्ह्यात फेटा घालणार नाही, अशी शपथ घेतली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात 11 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत बळीराजा कसाबसा आपले जीवन जगतो आहे. असे असतानाही हे भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार कोल्हे यांनी यावेळी केला.
आपल्या भाषणाच्या शेवटी खासदार कोल्हे यांनी उपस्थित जनतेला उद्देशून प्रश्न केला की, मी केव्हा फेटा बांधायला बीड जिल्ह्यात येऊ. त्यांच्या या शपथेची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीवर स्वतः जयंत पाटील यांनीच शिक्कामोर्तब केले. तसेच कार्यकर्त्यांना उद्यापासून प्रचाराला लागा अशा सूचनाही केल्या आहेत.