बीड - विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पराभवानंतर पंकजा मुंडे एकदाही नागरिकांसमोर आल्या नाहीत. गोपीनाथ गडावरून आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत, अशी माहिती देणारी पोस्ट त्यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा - भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर
राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती असताना अनेक नेतेमंडळी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करत होती. मात्र त्यात पंकजा मुंडे कुठेच दिसल्या नाहीत. गेल्या दीड महिन्यात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यापासूनही पंकजा मुंडे काहीशा दुरच राहिल्या. मात्र आता 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरून आपल्या पुढील राजकीय कारकीर्दीसंदर्भात भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी राज्यात महाआघाडीने बहुमत सिद्ध करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी विरोधकांमध्येही अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहे.