बीड - येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु असतानाच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत कोविड वार्डमधील साहित्याचीही तोडफोड केली.
बीड जिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसांपासुन उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय वृद्ध रुग्णाचा बुधवारी सायंकाळी शौचालयात गेल्यावर चक्कर आल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये गोंधळ घातला तसेच डॉक्टरांना देखील मारहाण केली आहे. या घटनेची माहिती होताच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तत्काळ संबंधित पोलिसांना यंत्रणांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास संदर्भात सूचना दिल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रुग्णालयाला भेट दिली असून तेथील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्याचे निर्देश दिले आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या कोरोनाग्रस्त आणि अतिगंभीर आजारांवरील रुग्णांवर उपचार होत आहेत. मात्र या ठिकाणी कोरोना वार्डातही रुग्णांच्या नातेवाईकांची सर्रास राबता असतो. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकदेखील नातेवाईकांना अडविण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. अशातच कोरोनामुळे रुग्ण मृत पावल्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून गोंधळ घालण्याचे प्रकारही घडतात. अशा घटना वारंवार घडत असून याकडे आपत्ती व्यवस्थापनाने लक्ष विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.