बीड - जिल्हा रुग्णालयात रुजू असतानाही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी बजावली आहे. काही डॉक्टर शासकीय रुग्णालयाकडून वेतन घेतात व जिल्हा रुग्णालयाला पुरेसा वेळ देत नाहीत. याचा परिणाम गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली आहे. नोटीस बजावलेल्या डॉक्टरांची संख्या 124 इतकी आहे.
डॉक्टरांवर खासगी प्रॅक्टिस संदर्भात निर्बंध
बीड येथील जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपीसाठी 315 खाटांची व्यवस्था केलेली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात 700पेक्षा अधिक खाटा वाढवण्यात आल्या होत्या. शासनाकडून गोर-गरीब रुग्णांसाठी आरोग्याच्या संदर्भाने सर्व यंत्रणा पुरवली जाते. मात्र, केवळ योजना राबवणारी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. तसेच, यापूर्वीही अनेकवेळा आरोग्य सेवा कोलमडल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातील गोर-गरीब रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने कामे नेमून दिलेले आहेत. हे सर्व कामे व्यवस्थित पार पाडावेत अशी अपेक्षा आहे. तसेच, या गोष्टींचा विचार शासकीय रुग्णालयात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या डॉक्टरांना शासनाकडून विशेष भत्ता दिला जातो. असे असतानाही अनेक डॉक्टरांचे खासगी दवाखाने सुरू आहेत. याचा परिणाम जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर होतो. हे डॉक्टर रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देऊ शकत नाहीत. याचा गांभीर्याने विचार करून, या पुढच्या काळात जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस संदर्भात निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच, त्यांना नोटीस बजावली असल्याची माहितीही डॉ. साबळे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून एका जागी असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस
बीड जिल्हा रुग्णालयातील आस्थापनामध्ये अनेक कर्मचारी खूप वर्षांपासून डेपोटेशनवर कार्यरत आहेत. बीड वगळता इतर तालुके अथवा जिल्ह्यात बदली झाली, तरी डेपोटेशनवर पुन्हा जिल्हा रुग्णालयात काम करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या मूळजागी जाण्याबाबत आदेश दिल्याची माहितीही डॉ. साबळे यांनी दिली आहे.