बीड - मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील एका विहिरीत बुधवारी (दि. 17 नोव्हेंबर) आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ती अकरावीच्या वर्गात शिकत होती.
सायली कल्याण पारेकर (वय 16 वर्षे, रा. गेवराई), असे मृत मुलीचे नाव आहे. सायली ही 15 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "मी मरतेय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. मात्र, सापडलेल्या चिठ्ठीत तिने आत्महत्या का केली याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सायलीची आत्महत्या आहे की कोणी हत्या केली याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.
सायलीच्या आई-वडिलांनी सायली बेपत्ता झाल्याची तक्रार गेवराई पोलीस ठाण्यात दिलेली होती. तक्रार देण्याच्या अगोदर नातेवाईकांकडे व इतरत्र शोधाशोध देखील केली होती. पण, सायली कुठेच सापडत नसल्याने अखेर तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच बुधवारी गोविंवाडी शिवारात एका विहीरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. हा मृतदेह सायलीचा असल्याचे समोर आले. सायलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तीने आत्महत्या केली की घातपात झाला, असा सवाल उपस्थितीत झाला आहे.