बीड- शहरात एक मन हेलावून सोडणारी घटना समोर आली आहे. शाळेतील एका दहा वर्षीय विद्यार्थ्याने 'माझे पप्पा' या निबंधातून आपल्या घरातील आर्थिक विंवचना व घरातला कर्ता पुरुष नसलेली रुखरुख स्पष्ट केली आहे. पत्रात, विद्यार्थ्याने आपल्या हयात नसलेल्या पित्याने घरी परत यावे, असे नमूद केले आहे. त्यामुळे, मुलाचे हे डोळे पानावणारे पत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
नशिबी अठराविश्व दारिद्र्य आलेल्या चौथ्या वर्गातील चिमुकल्या मंगेश वाळकेचे वडील आजारपणात मृत्यू पावले आहेत. मंगेशने लिहिलेले पत्र वाचल्यानंतर वाचणाऱ्या प्रत्येकांच्या पापण्या ओल्या झाल्या शिवाय राहणार नाहीत. मंगेशने लिहिलेल्या निबंधात कुटुंबाची आर्थिक विवंचना आणि घरातला कर्ता पुरुष नसलेली रुखरुख स्पष्टपणे जाणवते. एवढेच नाही तर 'पप्पा तुम्ही परत या' असे भावनिक वाक्य लिहून मंगेशने त्या पत्राचा शेवट केला आहे. बाप हयात नसलेल्या पोराने बापावर लिहिलेल्या निबंधाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
मंगेश हा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतो. त्याने 'माझे पप्पा' या विषयावर निबंध लिहिला आणि त्याच्या कोवळ्या मनाच्या वेदना आणि नितळ भावना कागदावर उमटल्या. ते वाचून त्याच्या शिक्षिका नजमा मैनुद्दीन शेख या भावनिक झाल्या. त्यांनी ओल्या डोळ्यांनी मंगेशच्या पत्रास आपल्या बारावीच्या वर्गमित्राच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केले.
मंगेशने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची व त्याची खरी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता, अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली. त्याची आई देखील अपंग आहे. त्यामुळे मंगेश घरातील सर्वच कामात आईला मदत करून शिक्षण घेत असल्याचे समजले. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मंगेशला वडील नसल्याचे दुःख तर आहेच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे आर्थिक संकट. त्यातही आई अपंग आणि इयत्ता चौथीत शिकणाऱ्या लेकराचे वय अवघे १० वर्षे. ज्या वयात मुले मजा-मस्ती करतात त्या वयात मंगेशवर घराची जबाबदारी आली.
सध्यास्थितीत मंगेशची आई शारदा वाळके या मोलमजुरी करून मंगेशचे शिक्षण करत आहेत. भविष्यात मंगेशने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, मोठा साहेब व्हावा, हीच त्यांची देखील अपेक्षा आहे. मात्र, मोलमजुरी करून जगायची पंचायत असलेल्या या कुटुंबासमोर मंगेशच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंगेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मंगेशसोबत त्याची आई आष्टी तालुक्यातील वाळके वस्ती येथे राहतात. मंगेशच्या कुटुंबीयांना समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीची गरज आहे. मंगेशची आई निरक्षर आहे. या पुढचे जीवन मोलमजुरी करून जगण्याचे मोठे आव्हान मंगेशच्या आईसमोर आहे.
हेही वाचा- युवा सेनेच्या राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने हल्ला; कारण अस्पष्ट